पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त; आ.मंगेश चव्हाण यांची बुलडोझर कारवाई

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी काही टवाळखोर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या तसेच या खुल्या इमारती जुगाराचे व दारूचे अड्डे झाल्याने याचा मोठा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता.
याबाबत त्या भागातील महिलांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनी मधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे असे कळविले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली. तिथे असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्यांची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीबीने उध्वस्त केल्या. आमदार मंगेश चव्हाण यांच्या या बुलडोझर कारवाईच्या निर्णयामुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हाकेला धावून येत तात्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसराच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तुमचा भाऊ हा नेहमी तुमच्या सोबत असून कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. तसेच या भागातील नगरपालिकेच्या खुल्या जागांना देखील तार कंपाउंड करण्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिले.