
उपसंपादक – कल्पेश महाले
चोपडा – सद्यस्थितीत सगळीकडे अराजकता माजली असून एका बाजूला कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत तर दुसरीकडे ज्यांच्या हातात कायद्याची सुत्रे आहेत, ज्यांनी कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे तर तेच लालसेपोटी किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी कायदा मोडून खात आहेत.
असाच काहीसा प्रकार विद्युत वितरण कंपनीमध्ये सुरु असून विद्युत वितरण कंपनीचे काही अधिकारी व कर्मचारी स्वताच्या फायद्यासाठी म्हणजेच पैसे कमावण्यासाठी विद्युत वाहिनीच्या तारांवर आकडे टाकून विद्युत चोरी करण्यासाठी हप्ते घेऊन परवानगी देणे, विद्युत पुरवठा सुरळीत करुन देण्यासाठी पैशाची मागणी करणे, कमी विद्युत बिल येण्यासाठी तांत्रिक बिघाड करुन देणे, विद्युत प्रवाह सुरळीत करुन देण्यासाठी तसेच नवीन मिटर बसवून देण्यासाठी पैशांची मागणी करुन विद्युत ग्राहकांची लुट करणे असे प्रकार सुरु असून विद्युत ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे.
अशीच एक घटना काल दिनांक १२ मार्च २०२५ बुधवार रोजी चोपडा शहरात घडली असून या घटनेत तक्रारदार विद्युत ग्राहकाच्या घरी नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने ५,५००/- रुपयांची लाच मागितली होती. अखेर तडजोडीअंती ४,५००/- रुपयांची लाच स्विकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. अमित दिलीप सुलक्षणे वय ३५ वर्षे, रा. प्लॉट.नं.६०, बोरोले नगर १ चोपडा, असे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, चोपडा तालुक्यातील तक्रारदार यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी सहायक अभियंता अमित सुलक्षणे (चोपडा शहर कक्ष २) याने ५,५००/- रुपयांची मागणी केली होती आणि तडजोडअंती ४५०० रुपये घेण्याचे ठरले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती.
यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि सहायक अभियंता अमित सुलक्षणे याला साडेचार हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पो.ना.बाळू मराठे, पो.ना.राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.