
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, भडगाव आणि मुक्ताईनगर येथील चार गंभीर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात जिल्हा पोलीस प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. या सर्व चोरीच्या घटनांमध्ये मध्यप्रदेशातील एका टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचे लग्न १७ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील विराम लॉन्स येथे झाले होते. या समारंभादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी १० लाख ४१ हजार रुपये किमतीचे ९ प्रकारच्या दागिन्यांची पिशवी चोरून नेली होती. या प्रकरणी चाळीसगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अमळनेर पोलीस स्टेशन, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन आणि भडगाव पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारच्या तीन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांमध्ये एकाच पद्धतीचा वापर केल्याचे पोलीसांच्या तपासात आढळले.
पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांच्या आधारे तपास करून मध्यप्रदेशातील या टोळीचा शोध लावला. या तपासादरम्यान, पोलीसांनी १६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तथापि, संशयित चोरटे अद्याप फरार आहेत, आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत या तपासाची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि चोरीच्या घटनांबाबत तत्काळ पोलीसांना माहिती देण्याचे सूचित केले. पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे आणि चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा आहे.
सदरची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते अपर पोलीस अधीक्षक जळगाव, कवीता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, बबन आव्हाड पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. जळगाव, पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते मुक्ताईनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक कुणाल चव्हाण, गणेश वाघमारे पो.ना.भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. महेश पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पो.ह. नितीन सोनवणे, पो.कॉ. किरण देवरे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पो.ह. राजकुमार चव्हाण पो.ना.सुरेश मेंढे पो.काॅ. सुनिल मोरे यांच्या पथकाने केली.