चाळीसगांव येथे बालविवाह प्रतिबंध मोहिम अंमलबजावणी बैठक नुकतीच संपन्न

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – दिनांक १८/०२/२०२५ रोजी “बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६” चे अंमलबजावणी बाबत प्रांताधिकारी प्रमोद हिले यांचे अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगांव येथील सभागृहात आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीस तहसिलदार चाळीसगांव, मुख्याधिकारी न.प.चाळीसगांव, गट विकास अधिकारी चाळीसगांव, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर व ग्रामीण पो.स्टे., सहा.पोलीस निरीक्षक, मेहूणबारे पो.स्टे., तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व तालुक्यातील ग्रामसेवक उपस्थित होते.
बैठकीचे सुरुवातीस चाळीसगांव प्रांताधिकारी यांनी “बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६” व “महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध नियम २०२२” याबाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली. शासन अधिसुचना दि. २१ ऑक्टोंबर २०२२ अन्वये, “बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६” चे अंमलबजावणीकामी विभागवार करावयाच्या कामाची माहिती दिली.
किशोरवयीन मुलींचे साखरपुडा सोहळा, लग्न सोहळा याबाबत माहिती घेवून संबंधीत पोलीस यंत्रणेमार्फत सोहळा थांबविणे, लग्न लावून देणारे ब्राम्हण यांची पो.स्टे. निहाय बैठका घेण्यात याव्यात, मंडप डेकोरेटर्स, बँण्ड, डी.जे., स्वयंपाकी यांच्या पो.स्टे. निहाय बैठका घेवून किशोरवयीन मुलींचे लग्नाबाबत माहिती मिळवणे, किशोरवयीन मुलींचा विवाह करुन शकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, बालविवाह करता येतील अशी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये यांचा शोध घेणे, सरपंच, बीट पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस पाटील यांच्या बैठका घेवून बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे इ. कामे पोलीस यंत्रणेने करण्याबाबत चाळीसगांव उपविभागातील तीनही पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना निर्देशीत करण्यात आले.
किशोरवयीन मुलींची यादी, त्यांच्या घरांची संख्या, गृहभेटी देणे, त्यांचे कडून शपथपत्र लिहून घेणे, बालविवाह रोखण्यासाठी प्रभाग सभा, ग्रामसभा व महिला सभा यांचे आयोजन करणे, विवाहाची अनिवार्यपणे नोंदणी करण्याबाबत जगजागृतीची कार्यक्रम घेणे इ. कामे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे १८ वर्षाखालील गर्भधारणा असलेल्या मुलींची संख्या व गावांची संख्या यांची नोंद ठेवण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना निर्देशीत करण्यात आले.
चाळीसगांव उपविभागात बालविवाहाची प्रकरणांवर सर्व विभागांनी लक्ष ठेवावे, बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बालविवाह प्रतिबंध करणेकामी सर्व विभागांच्या यंत्रणेने जनजागृती करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत अहवाल वेळोवेळी सादर करण्याबाबत निर्देशीत करण्यात येवून बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.