मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा केलेल्या आरोपींना अटक
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – दि. ०४/०१/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास अशोक रघुनाथ गायकवाड, वय ६० वर्षे, रा. देवळी, ता.चाळीसगांव हे त्यांचे राहते घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधून येवून घराच्या मागील दरवाजा प्रवेश करून काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवारीने व चाकूने अतिशय निर्दयपणे व क्रूरपणे वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या डोक्यावर, दोन्ही गालांवर व दोन्ही हातांवर वार करण्यात आले होते. यामध्ये अशोक गायकवाड यांना त्यांचा डावा हात गमवावा लागला आहे. सदरबाबत जखमी अशोक गायकवाड यांची सुन बेबाबाई चंदर गायकवाड, रा. देवळी ता.चाळसीगांव यांच्या तक्रारीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं ०३/२०२५ भा. न्या. सं. कलम १०९, ३३२ (सी), २३८, ३ (५) सह मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) / १३५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्हयातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसेच सदरची घटना ही रात्रीच्या वेळी झालेली असल्याने आरोपींची ओळख पटवून अटक करणे एक आव्हान होते.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग राजेशसिंह चंदेल यांनी सदर गुन्हयातील दोन्ही अनोळखी आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या या सुचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी प्रविण दातरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते.
या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपणीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी सागर राजू गायकवाड वय २४ वर्षे, रा. देवळी ता.चाळीसगांव यास गुन्हयात अटक केली. नमुद आरोपीने गुन्हयाची कबुली देवून सदरचा गुन्हा हा त्याचा अल्पवयीन लहान भाऊ याचेसह केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपीचा लहान भाऊ यास पोलीसांनी ताब्यात घेवून तपास केला असता त्याचा गुन्हातील सहभाग निष्पन्न झाला असून तो अल्पवयीन असल्याने त्यास अभिरक्षा गृह, जळगांव येथे जमा करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी जखमी इसमावर ज्या तलवारीने व चाकूने वार केले होते ती तलवार व चाकू गुन्हयाचे तपासात पोलीसांनी हस्तगत केली आहे.
सदरची करवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे तसेच पो.हे.कॉ. गोकुळ सोनवणे, दिनेश पाटील, किशोर पाटील, शांताराम पवार, पो.ना. प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, अशोक राठोड, पो.कॉ. निलेश लोहार, भुषण बाविस्कर, विनोद बेलदार, संजय लाटे यांनी केली आहे.