मनोरुग्ण तरुणासाठी मेहुणबारे पोलीस ठरले देवदूत

उपसंपादक – कल्पेश महाले
मेहुणबारे – चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावात रस्त्यावर रात्री साडेअकराच्या सुमारास संशयितरीत्या फिरणाऱ्या या तरुणासाठी येथील पोलीसांची खाकी सरसावली व त्याला निवारा उपलब्ध करून देत जेवणाचीही सोय केली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अटक करणे, गुन्हे आटोक्यात आणणे आणि ते उघडकीस आणून आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणे पोलीसांचे कर्तव्यच आहे. या पलीकडे जाऊन खाकी वर्दीतील या माणसांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले. याचाच एक प्रत्यय ३२ वर्षीय मनोरुग्ण तरुणाच्या बाबतीत नुकताच आला.
याबाबत माहिती अशी, की देवळी गावात एक तरुण संशयितरित्या फिरत असतानाही काही ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामीण भागात सध्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत असल्याने हा तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असावा असा संशय ग्रामस्थांना आला. त्यामुळे काही सजग ग्रामस्थांनी या तरुणाबाबत येथील पोलीसांना कळवले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तात्काळ आपले पोलीस सहकारी निलेश लोहार व नंदू महाजन यांना देवळी गावात पाठवले व संशयित म्हणून त्या मनोरुग्ण तरुणाला ताब्यात घेऊन मेहुणबारे पोलीस स्टेशनला आणले.
या मनोरुग्ण तरुणाचा रात्रभर केला सांभाळ
त्याची पोलीसांनी चौकशी केली असता, तो काहीच बोलत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तो मनोरुग्ण असल्याची पोलीसांची खात्री झाली. गावातील काही तरुणांच्या मदतीने पोलीसांनी या मनोरुग्ण तरुणाची देखभाल करीत त्याचा रात्रभर सांभाळ केला. मनोरुग्ण तरुण केवळ ‘बीड’ एवढाच शब्द उच्चारत होता. त्या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे पुढे काय करायचे? असा प्रश्न पोलीसांना पडला.
या मनोरुग्ण तरुणाला शिरसगाव येथील देवाज बहुउद्देशीय संस्थेच्या आश्रमात केले दाखल
मनोरुग्ण तरुणाला असेच सोडून दिले तर त्याच्याबाबतीत काहीही घडू शकते. या दरम्यान पोलीस नाईक निलेश लोहार यांना शिरसगाव येथील देवाज बहुउद्देशीय संस्थेविषयी माहीत होते. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दातरे यांना सांगून शिरसगाव येथील देवाज संस्थेच्या संबंधितांशी संपर्क साधला. त्यानुसार, मनोरुग्ण तरुणाला शिरसगाव येथे पोलीस घेऊन गेले.
या ठिकाणी अगोदरच जवळपास ३५ निराधार राहत आहेत. देवाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोरुग्ण तरुणाला त्यांच्या संस्थेत ठेवण्याबाबत होकार दिला. आणि सध्या मनोरुग्ण तरुण येथे इतरांसोबत राहत आहे. दरम्यान या मनोरुग्ण तरुणासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी देवाज संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.