
(उपसंपादक – कल्पेश महाले)
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ९९ उमेदवार जाहीर करण्यात आले असून यातील २० उमेदवार हे राजकीय कुटुंबातील असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपने घराणेशाही जपली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजपने माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांच्याच कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री तीन नातलग, माजी मंत्री, खासदार व आमदार यांचे नातेवाईक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने उतरवले आहेत. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी दिली आहे. जिंतूर येथून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर, केज येथून माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सुनबाई नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भोकरदन मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव अतुल सावे, तुळजापूर मतदारसंघातून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर, मुखेड येथील माजी आमदार राठोड यांचे पुत्र तुषार राठोड यानं उमेदवारी देण्यात आली आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कन्या प्रतिभा पाचपुते, शेवगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे, कल्याण पूर्व येथून माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, खामगाव येथून माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर, हिंगण येथून दत्ता मोघे यांचे पुत्र सागर मोघे, चंदवाड येथून माजी मंत्री दौलतराव आहेर यांचे पुत्र राहुल आहेर, मालाड येथून माजी मंत्री आशिष शेलार यांचे बंधु विनोद शेलार, कणकवली येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांना संधी देण्यात आली आहे.
पुणे येथील शिवाजीनगर मतदारसंघातून खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे, दौड येथून माजी आमदार सुभाष कुल यांचे पुत्र राहुल कुल, इचलकरंजी येथून माजी आमदार प्रकाश आवडे यांचे पुत्र राहुल आवडे तर कोल्हापूर येथून खासदार धनंजय महाडीक यांचे पुतणे अमल महाडीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.