
(उपसंपादक – कल्पेश महाले)
नवी मुंबई:- साडे तीन लाख रुपयांची लाच घेताना नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या घटनेने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. बेलापूर शाहबाज येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी आरोपीच्या सुटकेसाठी लाच मागण्याचे हे प्रकरण होते. सतीश कदम यांनी यापूर्वीच १४ लाख रुपयांची लाच घेतली होती. आता त्यांनी पुन्हा १२ लाखांची लाखांची लाच मागितली होती. त्यात ५ लाखांची तडजोड झाली आणि ४ लाख रुपये घेताना मंगळवारी अटक करण्यात आली. सतीश कदम यांना ५ दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा पनवेल न्यायालयाने सुनावली आहे.
सविस्तर माहिती अशी की, यंदा २७ जुलै रोजी बेलापूरच्या सेक्टर १९ मधील शाहबाज गावात चार मजली इमारत कोसळली होती. यात तिघांचा बळी गेला होता. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इमारत दुर्घटना प्रकरणात दोन बिल्डरांसह एका गुंतवणूकदारावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. इमारत दुर्घटनेतील गुंतवणूकदार महेश कुंभार यांना विविध गुन्ह्यात अडकवून त्यांच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी देत तब्बल १४ लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांकडून सतीश कदम यांनी उकळले होते. तुझ्या वडिलांना तुरुंगात सडत ठेवतो, असे सांगत कुंभार कुटुंबाकडून ५० लाख रुपये मागितल्याची तक्रार महेश कुंभार यांचा मुलगा अजय कुंभार यांनी केली होती. सुरुवातीला १२ लाख रुपये सतीश कदम यांना दिले होते. त्यानंतर कदम यांनी पुन्हा २ लाखांची लाच मागितली. तेही त्याला दिले. त्यानंतर त्यांनी पुन्हा २० लाखांची मागणी केली.
कदम वारंवार पैसे मागत असल्याने अजय कुंभार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यास सांगितले.
या प्रकरणी तक्रारदार यांनी पीआय सतीश कदम यांची एसीबी मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी केली. त्या दिवशी एसीबीने पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणीमध्ये पीआय सतीश कदम यांनी तडजोडीअंती ४ लाख रुपयांची मागणी केली.
ही लाचेची रक्कम त्याच दिवशी रात्री दहा वाजता ते राहत असलेल्या इमारती जवळ आणून देण्याचे सांगितले. त्यावरून सापळा रचून साडे तीन लाख रुपये घेतांना एन आर आय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना ते राहत असलेल्या इमारती खाली रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सरिता भोसले, एसीबी मुंबई यांच्या पथकाने केली.
लाचखोर पोलीस निरीक्षक ची संपत्ती
नवी मुंबई एसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने बुधवारी सकाळपासून सतीश कदम यांच्या सदनिका क्र.७०१ व ७०५, ऑर्चिड हाइट्स, सेक्टर 23 उलवे घराची झडती घेतली.
यावेळी मिळून आलेली मालमत्ता –
१. सदनिका ७०५, ऑर्चिड हाइट्स, सेक्टर 23 उलवे नवी मुंबई ही लोकसेवक सतीश कदम यांच्या नावे सन 2017 मध्ये खरेदी
2. सदनिका ७०१, ऑर्चिड हाइट्स, सेक्टर 23 उलवे नवी मुंबई ही लोकसेवक सतीश कदम व सौ. नीता सतीश कदम यांच्या नावे सन 2019 मध्ये खरेदी
3. तुलसी वेदांत इंटरप्राईजेस एलएलपी यांच्या वतीने सौ.निता कदम व प्रेम कदम यांच्या नावे क्रमांक सात भूखंड क्रमांक 474 सेक्टर 25 पुस्तक वहाळ तालुका पनवेल हा सुमारे 170 चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड ट्रॅक्टर नोंदणी
घरातील वस्तूंची किंमत
१. सदनिका क्रमांक ७०५ मध्ये 3,39,350/- रु. किमतीचे घरगुती सामान मिळून आले आहे
2. सदनिका क्रमांक ७०१ मध्ये ८२,१००/- रु. किमतीचे घरगुती सामान मिळून आले आहे
3. ४८ लाख रोख रक्कम
वाहन
1) सतीश कदम यांचे नावे मारुती सुझुकी सेलेरिओ कार नंबर एम.एच. ४६ बीके ७६४८
2) सौ.नीता कदम यांचे नावे हुंडाई वेरना कार नंबर एम.एच. 05 सी.व्ही.२००१
3) मुलगा प्रेम कदम यांचे नावे ऑडी ए-६ कार नंबर डी. डी. ०१ सी १८५०
सोने २४५ ग्रॅम
आढळून आले.