जळगाव जिल्हा परिषदेचा लिपिक नरेंद्र खाचणेला १ लाख ८० हजारांची रंगेहात लाच घेताना एसीबी पथकाकडून अटक

उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – शिपायाला बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) असे त्या लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र किशोर खाचणे याचेवरील कारवाई बुधवारी (ता.२१) रात्री भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलात करण्यात आली. तक्रारदार हे यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर रावेर पंचायत समिती येथे बदली झाली आहे. बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी लिपीक नरेंद्र खाचणे याने २ लाख रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदार नुकतेच आजारपणातून बाहेर निघाले असून त्यांच्याकडे तजवीज होत नसल्याने त्यांनी यापूर्वी २० हजारांची रक्कम नरेंद्र खाचणे याला दिलेली होती.
उर्वरित १ लाख ८० हजारांसाठी लिपिक नरेंद्र खाचणे याच्याकडून तगादा लावला जात होता. “आपल्या मदतीशिवाय तुम्हाला कुठेही लाभ मिळणार नाही” असेही तो धमकावत होता.
त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलीहोती. त्यानुसार बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तडजोडीअंती तक्रारदाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक नरेंद्र खाचणे याला बुधवारी रात्री साडेदहा वाजता अटक केली.
यानंतर त्याच्या लोकेशनगर येथील घराची झडती घेतली असता, त्यात ८ लाख १५ हजार ४१७ रुपयांची बेनामी रोकड मिळून आली आहे. संशयिताला न्यायालयात सादर केले असता पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एन.एन.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेंद्र पाटील,रवींद्र घुगे, शैला धनगर, बाळू मराठे, सुनील वानखेडे, राकेश दुसाने, प्रनेश ठाकूर, किशोर महाजन,प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने सदरील कारवाई केली.