लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक.

चाळीसगाव तालुका प्रतिनिधी- कल्पेश महाले
चाळिसगाव – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने सज्ज राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सोमवारी चाळीसगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा तसेच महसूलसह निवडणूक विभाग, पोलीस विभाग आदींची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी निवडणुकीशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून याबाबत पूर्वतयारी व्यवस्थित झाली तर निवडणुकीच्या काळात आढावा बैठक घेण्याची गरज भासणार नाही असे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
निवडणुकीचे काम करणाऱ्या प्रत्येक विभागाने काळजीपूर्वक पूर्व तयारी केली तर धावपळ होणार नाही असे सांगत निवडणुकीची पूर्वतयारी काटेकोरपणे करण्याची सक्त ताकीदच त्यांनी यावेळी दिली. सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त सूचना दिल्यात. निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील मतदान केंद्राचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करून पूर्ण करून घ्याव्यात. नोडल अधिकाऱ्यांनी ही आपली कामे वेळेत पूर्ण करून ठेवावीत असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव अभयसिंग देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर तहसिलदार जगदीश भरकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, यांच्यासह सर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते