रात्रीच्या वेळेला रुग्णांना सेवा देण्यासाठी ग्रामस्थांची मागणी; ग्रामस्थांच्या मागणीला डॉक्टरांचा सकारात्मक प्रतिसाद

कजगाव प्रतिनीधी संजय महाजन.
कजगाव येथील डॉक्टर रात्रीच्या वेळी रुग्णांना सेवा देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत होता. त्याच पार्श्वभूमीवर कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने डॉक्टर व ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर रात्रीची वैद्यकीय सुविधा देत नसल्याने वाढती तक्रार लक्षात घेता ग्रामपंचायतीने सर्व डॉक्टरांना नोटीस पाठवून डॉक्टर व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
कजगाव येथील डॉक्टर रात्री उपचारासाठी उठत नसल्याने रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे संपूर्ण गावात नाराजीचा सूर व्यक्त होत होता. खाजगी डॉक्टरांची वाढती मनमानी पाहता ग्रामस्थाचा उद्रेक वाढला होता. अखेर लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच समाधान पवार, ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन, यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर व ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली.
सदरील बैठकीत डॉक्टराबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा’च वाचला व आपले म्हणणे मांडून डॉक्टरांनी रात्रीची सुविधा द्यावी अशी मागणी केली. यावेळी डॉक्टरांनी ही आपल्या विविध अडचणी बैठकीत मांडून आपले म्हणणे मांडले व रात्रीच्या वैद्यकीय सेवे बाबत सहकारी डॉक्टरांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांच्या मागणीला डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे. मात्र डॉक्टरांनी दिलेले आश्वासन किती वेळ पर्यंत चालेल हा पुढचा विषय असला तरी डॉक्टरांनी रुग्णांना दिवसाप्रमाणेच रात्रीची ही सुविधा द्यावी अशी अपेक्षा ग्रामस्थानी व्यक्त केली आहे. यावेळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरकारी व खाजगी डॉक्टर, तसेच पत्रकार व ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.