एरंडोल न्यायालयात भरविण्यात आलेल्या लोक अदालत मध्ये ४ प्रलंबित प्रकरणे निकाली.

प्रतिनिधी इम्रान शेख कासोदा
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एरंडोल न्यायालयात भरविण्यात आलेल्या लोक अदालत मध्ये पती-पत्नीतील १४ वर्षांपासूनची कटुता दूर करण्यात आली आहे. त्यामुळे दोघांमध्ये दाखल असलेले ४ प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की एरंडोल तालुक्यातील रेहानाबी पटेल आणि त्यांचे पती शफी अन्वर पटेल यांच्यात कौंटुबिक वाद निर्माण झाल्यामुळे ते साधारण १४ वर्षांपासून विभक्त राहत होते, त्यांना ३ मुली आणि १ मुलगा असून आई वडील यांच्यातील वादा मूळे मुलांना देखील अडचणींचा सामना करावा लागत होता.
पत्नी तर्फे विधीज्ञ संजिदाबी शेख तर पती तर्फे विधीज्ञ श्री. सैय्यद यांनी त्या दोघांमध्ये तडजोड होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजीच्या लोक अदालत मध्ये न्यायाधीश श्री. विशाल श्रावण धोंडगे पॅनल प्रमुख तथा सह दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एरंडोल आणि पॅनल सदस्य विधीज्ञ श्री. पी. एस. बिर्ला यांनी सदर पती पत्नी यांच्यातील वाद मिटण्याच्या दृष्टीने चर्चा केली. त्यात यश आल्याने पती पत्नी यांच्यातील १४ वर्षापासूनचा दुरावा मिटलेला आहे. त्या दोघांचे न्यायाधीश श्री. विशाल श्रावण धोंडगे यांनी बुके देऊन अभिनंदन केले तसेच सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष श्री. ए.पी.देशमुख, वकील श्री. डी. एस. पाटील, सरकारी वकील श्री. डी. बी. वळवी, सरकारी वकील सौ. आर. बी. देवराज, वकील श्री. डी. बी. महाजन, श्री.अजिंक्य काळे, श्री. पी.बी.पाटील, श्री.आकाश महाजन, श्री. सुजित पाठक हे उपस्थित होते