मराठी सिनेसृष्टीतला तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
मुंबई:- मराठी कलाक्षेत्राला धक्कातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा त्यांचं वजन झपाट्याने कमी झालं होतं. त्यांची स्थिती कोणालाच पाहवत नव्हती. तरी त्यांनी हिमतीने कॅन्सरवर मात केली आणि ते ठणठणीत बरे झाले. तब्येत सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.
कॅन्सरवर मात करुनही गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्यांना काही कॉम्प्लिकेशनला सामोरं जाव लागत होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकतेच त्यांनी जोमाने काम सुरु केलं होतं. मात्र तब्येतीने त्यांची साथ दिली नाही. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. एक हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून हरपला आहे.
अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रियतमा’, ‘वासूची सासू’, ‘आम्ही आणि आमचे बाप’ या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय ‘आर के लक्ष्मण की दुनिया’, ‘जागो मोहन प्यारे’ सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं. त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं.
अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील गेल्या काही वर्षांमधील अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका सकारली होती. तसेच त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे.
अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.
अतुल यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता ते पुन्हा ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.