दोन हजार रुपयांची लाचेची मागणी भोवली; नरडाणा पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पावरा धुळे एसीबीच्या जाळ्यात.

उपसंपादक – कल्पेश महाले
धुळे – तक्रारदार हे मौजे दोंदवाडा, ता. शिरपुर, जि. धुळे येथील रहिवाशी असुन त्यांचा चुलत भाऊ तक्रारदार यांच्या मोटार सायकलने दोंदवाडे गावातुन धुळे येथे जात असतांना मुंबई आग्रा महामार्गावरील नरडाणा येथील पुलावर मोटार सायकल घसरुन त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर तक्रारदार हे त्यांचे भावाकडे असलेल्या मोटार सायकलची चौकशी करण्याकरीता नरडाणा पोलीस स्टेशन येथे गेले असता तेथे हजर असलेले पोलीस कॉन्स्टेबल गजु उर्फ गजेंद्र पावरा यांनी तक्रारदार यांना त्यांचे भावाजवळील मोटार सायकल नरडाणा पोलीस स्टेशन येथे जमा असल्याचे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी पो.कॉ. पावरा यांना मोटार सायकल देण्याची विनंती केली असता त्यांनी मोटार सायकल परत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दि. १७.१२.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयास दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती. सदर माहितीवरुन धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने नरडाणा येथे जावुन तक्रारदार यांची भेट घेवुन त्यांची तक्रार नोंदवुन सदर तक्रारीची दि.१७.१२.२०२४ रोजी पडताळणी केली असता पो.कॉ. गजेंद्र पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडे २,०००/- रूपये पंचांसमक्ष लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यावरून आज पो.कॉ. गजेंद्र पावरा, नेमणुक नरडाणा पोलीस स्टेशन याचे विरुध्द नरडाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, रामदास बारेला, जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.