उपसंपादक – कल्पेश महाले
मुंबई – आर्थिक लाभाच्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कोणत्याही योजनांसाठी निधी वळता करण्यापूर्वी त्याची व्यवहार्यता तपासून पाहा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध आर्थिक लाभाच्या योजना सुरू केल्या. पण यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार येत असल्याचे भान आता सरकारला येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना उपरोक्त सूचना केली आहे. ते अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत बोलताना म्हणाले की, सार्वजनिक योजना, आदिवासी, सामाजिक न्याय विभाग व डीपीडीसीच्या (जिल्हा नियोजन विकास समिती) योजनांवर गरज असेल तरच खर्च करा. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजनांवर कोणतेही निर्बंध आणू नका. या योजनांत लाडकी बहीण योजना व शिष्यवृत्ती सारख्या योजनांचा समावेश आहे. विकासकामाच्या प्रकल्पांची ग्राउंडवरील वस्तुस्थिती व गरज लक्षात घेऊनच खर्च करण्यास प्राधान्य द्या.
जिल्हा पातळीवरील योजनांना लागणार ब्रेक?
अर्थमंत्री अजित पवार यांच्या या सूचनेमुळे यापुढे जिल्हा पातळीवर सुरू असणाऱ्या विविध योजनांना ब्रेक किंवा खर्चा कात्री लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अर्थ विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नुकतेच यासंबंधी सूतोवाच केले होते. सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार वाढल्यामुळे काही योजनांवर फेरविचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर दस्तुरखुद्द अजित पवार यांनी आशिष जयस्वाल यांना या अनुषंगाने अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जयस्वाल हा अहवाल लवकरच अजित पवार यांना सादर करणार आहेत. या अहवालात डीपीडीसीच्या कोणत्या योजनांना कात्री लावता येईल याचा आराखडा असण्याची शक्यता आहे.
डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण सुरू
दुसरीकडे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात आजपासून सुरू होत आहे. साधारणपणे ९ ऑक्टोबरला आपण शेवटचे वितरण केले होते. तेव्हा जवळपास २ कोटी ३४ लाखांहून अधिक महिलांना आपण या योजनेचा लाभ दिला होता.
आज डिसेंबर अखेर हप्त्याचे वितरण करत असताना यात 2२ कोटी ३४ लाख महिलांचा समावेश आहेच. पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे (आधार कार्ड लिंक करणे) लाभापासून वंचित राहावे लागत होते, त्यातल्याही ज्यांचे आधार सीडिंग झाले आहे, त्या लाभार्थी महिलांना सन्माननिधीच्या वितरणाची सुरुवात आपण करत आहोत. येत्या ४ ते ५ दिवसांत टप्प्याटप्प्याने आपण हे वितरण करणार आहोत.
आज साधारणपणे आधार सीडिंग नव्याने झालेल्या १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभाची सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ६७ लाखांहून जास्त महिलांना आज हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. असेच उद्या, परवा आणि पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल. आपल्याला लाडक्या बहीण योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांच्या माध्यमातून मिळत आहे. पण या निधीचा आपल्या उद्योगधंद्यांसाठी, आरोग्यासाठी, कुटुंबासाठी, स्वत:साठी योग्य तो वापर करावा, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.