उपसंपादक – कल्पेश महाले
मेहुणबारे – दि. १२/१२/२०२४ रोजी तक्रारदार श्री.भाऊसाहेब युवराज पवार, रा. दहिवद, ता. चाळीसगांव यांच्या एकूण ५३,०००/- रूपये किंमतीच्या ०५ बकऱ्या व दि. १३/१२/२०२४ रोजी तक्रारदार प्रविण तुळशीराम पाटील रा. खडकी सिम, ता. चाळीसगांव यांच्या ८९,०००/- रूपये किंमतीच्या एकूण ११ बकऱ्या रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटयांनी चोरी केलेबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे अनुक्रमे गुन्हा रजि. नं. ३११/२०२४ व ३१२/०२४ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव उपविभाग श्री.राजेशसिंह चंदेल यांनी सदर गुन्हयांचा सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेला मुददेमाल हस्तगत करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. मा.वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे नमुद गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून चोरीस गेलेला मुददेमाल हस्तगत करणेकामी प्रभारी अधिकारी श्री.प्रविण दातरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी एक तपास पथक तयार केले होते. सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री.सुहास आव्हाड व पोहेकॉ. गोकूळ सोनवणे, पोहेकॉ. सचिन निकम, पोहेकॉ. शांताराम पवार, पोकॉ. विनोद बेलदार यांनी सदर गुन्हयाचा सखोल तांत्रीक तपास तसेच गोपनिय माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील बकऱ्या चोरी करणारा मुख्य आरोपीचे नांव निष्पण्ण करून त्याच्याकडून बकऱ्या विकत घेणारा आरोपी हुसेन समशुभाई खाटीक, रा.हांडेवाडी फाटा, मंजूर, ता. कोपरगांव, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरच्या बकऱ्या हया चोरीच्या असल्याचे माहिती असताना देखील कमी किंमतीमध्ये विकत घेतल्याची कबुली दिली असून सदरच्या बकऱ्या विक्री करून मिळालेली रोख रक्कम एकूण ८४,०००/- रूपये त्याच्याकडून गुन्हयाचे तपासात जप्त करण्यात आली आहे. तसेच यातील बकऱ्या चोरी करणारा मुख्य आरोपी हा फरार असून त्याचा शोध मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून घेण्यात येत आहे.
सर्व नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहून आपले पशुधन चोरी होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच परिसरात चोरीच्या घटनांबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. असे आवाहन मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी केले आहे.