चाळीसगाव विधानसभा मतदार संघात गृहभेटीद्वारे १०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
उपसंपादक -कल्पेश महाले
चाळीसगाव – १७ चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आज दिनांक ९ नोव्हेंबर २०२४ रोजी ८५ वर्षावरील जेष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदार यापैकी पात्र ठरलेले ११३ मतदारांची गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यात आला. ११३ पात्र मतदारांपैकी १०६ मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क गृहभेटीद्वारे बजावला. उर्वरित ७ मतदारांपैकी ५ मतदार फॉर्म नंबर १२ ड भरून दिल्यानंतर मयत झालेले असल्याने त्यांचे मतदान करून घेता आले नाही . तसेच १ मतदार वैद्यकीय उपचार घेण्यासाठी बाहेरगावी गेलेले असल्याने ते आज उपलब्ध झाले नाहीत. त्यांच्यासाठी उद्या पुन्हा एकदा मतदान पथक गृह भेट देऊन मतदान करून घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच गणेशपुर येथील दिव्यांग मतदार श्री बापू शिवराम निकम यांनी मतदान करण्यास नकार दिलेला आहे .त्यांचे सुद्धा उद्या पुन्हा एकदा गृहभेटीद्वारे मतदान करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
गृहभेटीद्वारे मतदानाचा हक्क बजावलेल्या एकूण १०६ मतदारांपैकी ८८ मतदार हे ८५ वर्षावरील जेष्ठ मतदार होते तर १८ मतदार हे दिव्यांग मतदार होते .सदर गृह मतदानासाठी एकूण ८ पथके स्थापन केलेली होती . प्रत्येक मतदान पथकात मतदान केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी , सूक्ष्म निरीक्षक आणि पोलीस शिपाई त्यांच्या समवेत होते , संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेले असून मतदान प्रक्रिया शांततेत पारदर्शक पद्धतीने पार पडलेली आहे . सदर गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रमोद हिले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सौरभ जोशी मुख्याधिकारी नगरपरिषद चाळीसगाव तथा नोडल अधिकारी यांच्या समवेत श्री बी आर शिंदे सहाय्यक नोडल अधिकारी आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. श्री सौरभ जोशी यांच्या पथकात श्रीमती प्रीती चौधरी सहाय्यक महसूल अधिकारी, श्री संजय पाटील सहाय्यक महसूल अधिकारी , श्री युवराज पाटील सहाय्यक महसूल अधिकारी आणि इतर महसूल सहाय्यक यांनी प्रचंड मेहनत घेऊन सदरची गृह भेटीद्वारे मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली .