रावेत पोलीस ठाण्यातील हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात: पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
पुणे:- अपघात प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुनावळे येथे करण्यात आली. ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय -४४) असे लाच घेणाऱ्या पोलीसाचे नाव असून ते रावेत पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे व्यापारी असून तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एका दुचाकीस्वाराचा पुनावळे येथे अपघात झाला होता. त्याबाबत एमएलसी झाल्यानंतर हवालदार बगाडे यांनी या अपघात प्रकरणी जबाब नोंदवून अपघात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी करून पुनावळेतील गंधर्व हॉटेलसमोर सापळा रचला. तसेच पाच हजारांची लाच घेताना बगाडे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.