(उपसंपादक – कल्पेश महाले)
पारोळा:- शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विविध कार्यकारी सोसायटीतून कर्ज घेण्यासाठी बोजा बसवण्याच्या मोबदल्यात १ हजारांची लाच घेणाऱ्या तलाठीसह एका खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई पारोळा तालुक्यातील लोणी येथे करण्यात आली. या घटनेने जळगाव जिल्हा महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पारोळा तालुक्यातील लोणी गावातील ३९ वर्षीय तक्रारदार यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे लोणी बु.ता.पारोळा येथे साडे सहा (६.५) एकर शेत जमीन आहे. सदर शेत जमिनीवर तक्रारदार यांना लोणी बु. गावातील वि.का.सो. सहकारी सोसायटीमधुन कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविणे आवश्यक होते.
त्यामुळे तक्रारदार हे चोरवड येथील तलाठी कार्यालयातील तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे वय- ३४ वर्षे, ह.मु. बोहरा स्कूल जवळ, वर्धमान नगर, पारोळा यांची पारोळा तालुक्यातील चोरवड येथील तलाठी कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुमच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्यांचे प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८०० रुपये आणि मागील कामाचे २०० रुपये असे एकूण १ हजार रुपये द्यावे लागतील.
संबंधित तलाठी ला तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली. दरम्यान पथकाने आज सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. तक्रारदार कडून खाजगी पंटर शरद प्रल्हाद कोळी वय-४३ रा.चोरवड ता.पारोळा यांच्या फोनपेवर टाकण्यास सांगून लाच मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पथकाने दोघांना अटक केली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ची कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पो.हे.कॉ.शैल धनगर,पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, पो.ना.बाळू मराठे, किशोर महाजन, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.