खरजई येथे अवैध मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुल पथकाने पकडले.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगाव:- चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२४ शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अवैधरित्या मुरूम (गौणखनिज) वाहतूक करणारे विना क्रमांकाचे महिंद्रा कंपनीचे एक ट्रॅक्टर-एक ट्रॉली जप्त करण्यात आले. या पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे मुरुम वाहतुक परवानगी विचारली असता सदरील टॅक्ट्रर चालकाकडे कोणतीही परवानगी आढळून आली नसता महसुल पथकाने ही कारवाई करून महिंद्रा कंपनीचे विना क्रमांकाचे, एक ट्रॅक्टर-एक ट्रॉली, पोलीस कवायत मैदान चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे.
महसुल पथकातील मंडळ अधिकारी विष्णु राठोड, मंडळ अधिकारी सुनिल पवार, तलाठी प्रशांत कनकुरे, तलाठी महेंद्र पाटील, तलाठी हर्षवर्धन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध गौणखनिज वाहतूक (वाळू, दगड, मुरुम) बाबत चाळीसगाव महसुल पथकाने जास्तीत जास्त कडक कारवाई संपूर्ण तालुक्यात व चाळीसगाव शहरात कराव्यात अशी सर्व परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.