गणेशपुर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव :- तालुक्यातील गणेशपुर येथील एका १३ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला असून यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत मुलाचे नाव रिंकेश नंदू मोरे असे होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेशपुर येथील रिंकेश मोरे हा शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गणेशपुर-पाटणा रस्तावर मुलांसोबत रनिंग साठी गेला असता, तीन ते चार मुले रनिंग करत पुढे गेली व रिंकेश हा मागे रनिंग करत असताना, अचानक ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आणि ओढत ऊसाच्या शेतात नेले. पुढे रनिंग साठी गेलेल्या मुलांना आपला मित्र दिसत नसल्यामुळे त्यांनी शोध घेतला असता परंतु रिंकेश मिळून आला नसल्याने याबाबतची माहिती रिंकेशच्या घरी जाऊन त्याच्या मित्रांनी दिली असता त्याचे आई-वडील आणि ग्रामस्थ त्याला तात्काळ शोधण्यासाठी गेले असता, प्रकाश पाटील यांच्या ऊसाच्या शेतात बालक मृतावस्थेत आढळून आला असता ग्रामस्थांनी लगेच ही माहिती वनविभागला कळवली असता वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला. या घटनेने पूर्ण परिवाराने एकच आक्रोश केला. मृत बालकाच्या पश्च़ात शेतमजूर वडील, आई, एक लहान भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
याच भागात बिबट्याने काही दिवसापूर्वी बकरी फस्त केल्याची माहिती मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी चाळीसगांव तालुक्यात नरभक्षक बिबट्याने अनेक बळी घेतले होते. त्या बिबट्याला शेवटी ठार करण्यात आले होते. त्या जुन्या आठवणी आजून ताज्या झाल्या असून चाळीसगांव तालुक्यात पुन्हा नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे.
निष्पाप बालकाचा नाहक बळी गेल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अजून दुसरा बळी घेण्याच्या अगोदरच त्या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी संपूर्ण ग्रामस्थांकडून होत आहे.