चाळीसगाव महसूल पथकाची धडक कारवाई – वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त.

चाळीसगाव महसूल पथकाची धडक कारवाई – वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव :- तालुक्यातील मेहूणबारे येथे दिनांक २५ मे रोजी शनिवार रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळू (गौणखनिज) वाहतूक करणारे विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर- ट्रॉली जप्त करण्यात आली.
विवेक सुनिल निकम, भीमसिंग कैलास ठोके, सागर अशोक ठाकरे, रा.मेहूणबारे ता.चाळीसगाव यांच्या मालकीचे ट्रॅक्टर मेहूणबारे येथे आढळून आले. या तिघही ट्रॉली मध्ये सुमारे साडे चार ते पाच ब्रास गिरणा नदीची वाळू दिसून आली. महसूल पथकातील श्री.योगेश सोनवणे, मंडळ अधिकारी, श्री.विष्णु राठोड, मंडळ अधिकारी, श्री.प्रशांत कनकुरे तलाठी, श्री.प्रकाश झाडे तलाठी, श्री.विनोद पवार तलाठी, श्री.गणेश गढरी तलाठी, श्री.चेतन ठाकूर तलाठी, श्री.विशाल सोनार तलाठी, श्री.सचिन हातोले तलाठी, श्री.हर्षवर्धन मोरे तलाठी, श्री.धीरज देशमुख तलाठी, यांच्या पथकाने ही धडक कारवाई करून वाळूसह महिंद्रा कंपनीचे विना क्रमांकाचे, तीन ट्रॅक्टर, तीन ट्रॉली, पोलीस कवायत मैदान चाळीसगाव येथे जमा करुन पंचनामा रिपोर्ट तहसील कार्यालय येथे सादर केलेला आहे. या कारवाईमुळे सर्व परिसरातील नागरिकांकडून संपुर्ण महसूल पथकाचे कौतुक होत आहे.
चाळीसगावात आरटीओ कार्यालय असताना आरटीओ अधिकाऱ्यांना हे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली दिसत नसतील का? विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जर चोरीचा वाळू वाहतुकीसाठी वापरतात तर हे आरटीओ अधिकारी या वाहनांवर कारवाई का करत नाहीत. चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीमधून मेहुणबारे, वडगांव लांबे, रहीपुरी, जामदा, या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होते. ही वाळू चोरी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकारी या वाळू चोरांकडून हप्ता घेतात का ? तसे नसेल तर हे ट्रॅक्टर का पकडले जात नाही ? अशी चर्चा व प्रश्न सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
कोणाच्याही दबावाला बळी न पडता, आरटीओ चाळीसगाव, चाळीसगाव महसूल विभाग, आणि चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि मेहुनबारे पोलीस स्टेशन यांनी जास्तीत जास्त कडक कारवाई करावी. अशी सर्व परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.