एक लाख रुपयांची लाच रंगेहाथ स्वीकारताना नंदाणे येथील सरपंचसह माजी सरपंचला धुळे एसीबीकडून अटक

उपसंपादक – कल्पेश महाले
पेट्रोलपंप उभारणीकरीता नाहरकत दाखला देण्यासाठी स्वीकारली एक लाखाची लाच
धुळे – तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सरपंच रविंद्र पाटील व माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे पेट्रोलपंप उभारणीकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, नंदाणे ता.धुळे येथील गट नं. ५९/३ येथे तक्रारदाराची शेतजमीन असुन या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरीता कंपनीच्या विभागिय व्यवस्थापकांनी दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवकाच्या नावे पेट्रोलपंप उभारणी करीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जावुन सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा केला असता सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. अशी तक्रार आज दि.२४ रोजी तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तक्रारीची धुळे एसीबीने पडताळणी केली असता सरपंच रविंद्र पाटील याने व त्याचेसोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रविंद्र पाटील याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन १ लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ याच्याकडे दिली असता त्याने ती स्विकारुन त्याच्या खिशात ठेवुन घेतली. दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.