निम्न तापी, पाडळसरे सिंचन प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची खासदार स्मिता वाघ यांची मागणी.

उपसंपादक – कल्पेश महाले
नवी दिल्ली – जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी सिंचन प्रकल्प PMKSY-AIBP मध्ये समाविष्ट करून शेवटच्या टप्प्यात असलेल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने तातडीने आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत केली. हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
या प्रकल्पामुळे 32,328 हेक्टर शेतीला सिंचन सुविधा मिळेल आणि हजारो नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होईल. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून हा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. महाराष्ट्र सरकारने ₹874.05 कोटी खर्च केले असले तरी अजूनही ₹2,014.00 कोटींची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारने 2024 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, तो PMKSY-AIBP योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, निधी मंजूर होण्यास विलंब होत असल्याने प्रकल्प लांबणीवर पडण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने निधी मंजूर करून प्रकल्प पूर्ण करावा, असे खासदार वाघ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारणाला गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जलसंधारण आणि सिंचन योजनेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (PMKSY), अटल भूजल योजना, जल जीवन मिशन आणि नमामी गंगे यांसारख्या योजनांमुळे देशभरात जलसंपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे सुरू आहे.
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार योजनेमुळे हजारो गावांमध्ये जलसंधारणाची मोठी कामे झाली. तसेच, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती मिळाली आहे. अशाच प्रकारे निम्म तापी सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार वाघ यांनी केली.
जल जीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील कामे प्रगती पथावर आहेत.
जळगाव जिल्ह्यात घरांना नळजोडणी मिळाली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला असून, उर्वरित भागात कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, काही प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. विशेषतः अमळनेर, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल, पारोळा, जळगाव आणि चाळीसगांव येथे पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यास उर्वरित प्रकल्प लांबणीवर जाऊ शकतात. त्यामुळे सरकारने त्वरित निधी मंजूर करून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी वाघ यांनी केली.
जलसंधारण आणि सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज
खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
• निम्न तापी सिंचन प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करावा.
• सिंचन आणि जलसंधारण प्रकल्पांचा वेळोवेळी आढावा घ्यावा.
• निधी वितरण प्रक्रियेला गती द्यावी, जेणेकरून कामे वेळेत पूर्ण होतील.
• ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सुधारणा कराव्यात.