लाचखोर ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला एक लाखांची लाच घेताना एसीबी ने रंगेहाथ पकडले.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
पारोळा:- जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना ताज्या असताना पारोळा तालुक्यातून लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. पारोळा तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाख रूपयांची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळपिंप्री गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ६० लाख रुपये किंमतीची चार विकासकामे मंजूर करण्यात आली होती. यामध्ये काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांचा समावेश होता. दरम्यान, या कामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील सुनील अमृत पाटील (वय ५८) ग्रामविकास अधिकारी नेमणूक पंचायत समिती पारोळा (ग्रामपंचायत विभाग वर्ग – ३), आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी सेवक) कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांनी १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
▪️लाचेची केली मागणी.
याप्रकरणात कंत्राटी सेवक बेलदार याने स्वतःसाठी १टक्के तर ग्रामविस्तार अधिकारी पाटील यांच्यासाठी २ टक्के लाच मागितली होती. दरम्यान, लाचेची मागणी केल्यानंतर धुळपिंप्री गावातील सरपंचांच्या मुलाने या लाचमागणीची तक्रार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.
▪️लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ.
जळगाव लाचलुचपत विभागाने आज २० सप्टेंबर रोजी पारोळा पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. तडजोडीअंती १ लाख रुपयांची रक्कम ठरली. दरम्यान, कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमक्ष १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याबरोबर ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पारोळा तालुक्यासह संपूर्ण जळगांव जिल्हयात शासकीय विभागांतील लाचखोर कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
▪️यांच्या पथकाने केली कारवाई.
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, पथकामध्ये पोहेकॉ. सुनिल वानखेडे, पोना. किशोर महाजन, पोना. बाळू मराठे, पोहेकॉ. सुरेश पाटील, रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.को.प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर यांचा समावेश होता.