चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण यांचा सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव– चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांनी विक्रमी मतांनी विजयी मिळवत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली. ग्रामीण व शहरी भागातही मोठ्या प्रमाणात आमदार चव्हाण यांना लीड मिळाला. आमदार मंगेश चव्हाण यांनी उबाठाचे उन्मेष पाटील यांचा ८५ हजार ६५३ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना १ लाख ५७ हजार १०१ मते मिळाली तर पाटील यांना ७१ हजार ४४८ मते मिळाली. २३ नोव्हेंबर शनिवार रोजी धुळे रस्त्यावरील प्रशासकीय इमारतीत मतमोजणी पार पडली.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघात बुधवारी ६१.६७ टक्के मतदान झाले होते. ३ लाख ७५ हजार ११ मतदारांपैकी २ लाख ३१ हजार २६९ मतदारांनी ३४४ मतदान केंद्रांवर जावून मतदान केले. यात पुरूष मतदार १ लाख २० हजार ७३६ तर स्त्री मतदार १ लाख १० हजार ५२४ इतके मतदार झाले. निकाल अत्यंत सनसनाटी लागला. पहिल्या फेरीपासूनच महायुतीचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आघाडी घेतली ती प्रत्येक फेरीगणीक वाढतच गेली. जसा जसा फेरीनिहाय निकाल समोर येत होता तस तसा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढत होता. दुपारी बारानंतर विजयाचा कल स्पष्ट होताच भाजपाच्या कार्यकतें व पदाधिकाऱ्यांनी ढोलताशांच्या डीजेच्या गजरात गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला. निकाल ऐकण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तर सोशल मीडियावर अपडेट माहिती मिळत होती.
दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी सलग दुसऱ्यांचा विधानसभेत प्रवेश केला आहे. तर एकवेळ आमदार व एक वेळा खासदार राहीलेल्या उन्मेष पाटील यांना मात्र दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. निकालानंतर आमदार मंगेश चव्हाण यांची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण राज्यातून आमदार मंगेश चव्हाण हे तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाल्याचे सांगण्यात येते. त्यांचे विजयाचे मताधिक्य ८५ हजार ६५३ हजार इतके असून हे चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील विक्रम ठरला आहे. आमदार चव्हाण हे चाळीसगावचे १४ वे आमदार ठरले आहेत. सर्वाधिक सात वेळा भारतीय जनता पार्टीने या मतदार संघातून विजय मिळवला आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले होते. विकास कामांच्या जोरावर हा विजय मिळवल्याचे नवनिर्वाचीत आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.