चाळीसगावात मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – चाळीसगाव विधानसभा मतदार संघात २० रोजी शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतिक्षा आहे. त्यासाठी उद्या दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी धुळे रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीत होणार आहे. एकूण २५ फेऱ्या होणार असून पहिली फेरीचा निकाल ९.३० वाजेपर्यंत हाती येईल. मतमोजणीची तयारी पूर्णत्वास आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले यांनी दिली. दरम्यान प्रशासकीय इमारतीच्या आवारात मतमोजणीसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, प्रथमेश मोहोड, विकास लाडवंजारी यांच्यासह निवडणुक नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभ, निवडणुक महसूल सहाय्यक सुधीर बच्छाव यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघात शहरासह ग्रामीण भागात एकूण ३४४ मतदान केंद्र असून मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल तर २५ वी फेरी अर्धी होईल.
सकाळी ८ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर यादृच्छिकपणे निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात शहरासह ग्रामीण भागात ३४४ मतदान केंद्रे असून मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल. तर २५ वी फेरी अर्धी होईल. साडे आठ वाजेनंतर ईव्हीएम मशिन मतमोजणीला सुरूवात होईल. साडे नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होईल.