भडगाव तालुक्यासह गिरणा परीसरात गोवर्धन पुजेचा उत्सव साजरा.

कार्यकारी संपादक – संजय महाजन
भडगाव – गोवर्धन पुजेचा उत्सव बलिप्रतिपदेच्या दिवशी दि. २ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील गिरणा परीसरातील वाडे गावासह बहुतांश गावांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाला नववर्षाची सुरुवात मानण्याची प्रथा आहे. तसेच वसुबारसनिमित्त ममतेचे प्रतीक असणाऱ्या गोमातेचे पुजनही मोठया उत्साहात करण्यात आले. परदेशी समाजासह काही इतर समाजातही परंपरागत गोवर्धन पुजेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
गोवर्धन उत्सवाच्या दिवशी परंपरेनुसार सारा परीवार सकाळपासुनच जोमाने तयारीला लागल्याचे चिञ दिसुन आले . महिलांनी सकाळीच अंगणात शेणाचा सडा टाकुन आकर्षक विविध रंगीबेरंगी रांगोळयांनी अंगण सजविलेले होते. टोपल्यांनी शेण जमा करुन महिलांनी शेणापासुन माणसाकृती ४ ते ५ फुटाचा भव्य पुतळा उभारला होता. त्या माणसाकृती पुतळयाला लागुन बालकाकृती छोटा जवळपास ३ फुटाचा शेणाचा पुतळा उभारला होता. या शेणापासुन साकारलेल्या पुतळयांना गोवर्धन म्हणतात. गोवर्धनाच्या अंगावर झेंडुची फुले वाहण्यात आलीत. गोवर्धनाच्या सभोवताली विविधरंगी आकर्षक रांगोळया व झेंडुच्या फुलांनी सजविण्यात आले होते. माणसे शेतातील ज्वारीचे तोटे किंवा ऊसाचे ४ ते ५ तोटे आणुन गोवर्धनाभोवताली ज्वारी किंवा ऊसाचे धांडे उभे करण्यात आले.बाजुला सफेद फुलांची वनस्पतीही लावण्यात आली. आणि या शेणाच्या पुतळयाच्या ( गोवर्धनाच्या ) मध्यभागी ताक घुसळण्याची रवी, रही धांडयाच्या मध्यभागी लाल कापडाने बांधली. आणि परदेशी, राजपुत समाजासह इतर शेतकरी परीवारामार्फत या गोवर्धनाची मनोभावे पुजा अर्चा करण्यात आली.यावेळी बैलाची जोडी सजवुन बैलांची पुजा करुन बैलांना या गोवर्धनाभोवती मालकासह धन्यासह जोडीने ९ किंवा ११ फेर्या मारण्यात आल्यात. सार्या परीवाराने या गोवर्धन पुजन, दर्शनाचा व उत्सवाचा आनंदात लाभ घेतला.हा गोवर्धन काही दिवस अंगणात तसाच राखला जातो. शेणापासुन तयार केलेला भव्य पुतळा म्हणजे गोवर्धन होय. इंद्राने केलेल्या अतिवृष्टीपासुन कृष्णरुपी गोवर्धन पर्वताने लोकांना वाचविले. याच मनुष्य ऋणातुन मुक्त होण्यासाठी गोवर्धनाची मोठया आनंदाने उत्साहवर्धक वातावरणात मनोभावे पुजा, अर्चा केली जाते. हा उत्सव उत्तर प्रदेशात गोकुळ, वृदांवन, मथुरा आदि ठिकाणी मोठया धामधुमीत साजरा केला जातो.
गोवर्धन पुजा हा हिंदु धर्मातील एक म्हत्वपुर्ण सण मानला जातो. दिपवाळीनंतर दुसर्या दिवशी बलीप्रतिपदेला हा गोवर्धन पुजा उत्सव परदेशी, राजपुत समाजासह इतर समाजात मोठया उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.निसर्गाचा आदर करणे. पाण्याचे, जमिनीचे तसेच जनावरांचे रक्षण करणे हा खरा गोवर्धन पुजेचा मुख्य उद्देश मानला जातो. हा सण निसर्गाशी आपले नाते दृढ करण्याचे प्रतिकही मानले जाते. या गोवर्धन पुजा, उत्सवानिमित्त संपुर्ण परीवार एकञ जमत आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो. हा सण समाजातील ऐक्य आणि एकात्मतेचा सन्मान करणारा आहे. अशी माहिती भडगाव तालुका परदेशी समाजाचे अध्यक्ष श्री.अशोक परदेशी यांनी दिली आहे.