लाचखोर औषध निरीक्षकाच्या जळगावातील घरात दागिन्यांसह ५० लाखांचे घबाड

उपसंपादक – कल्पेश महाले
धुळ्यात आठ हजारांची लाच घेताना औषध निरीक्षक किशोर देशमुख व पंटर तुषार जैन यांना केली होती अटक, पोलीस कोठडीत रवानगी
धुळे – धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेला किशोर देशमुख याच्या जळगांव येथील राहते घरातून सुमारे ५० लाखांचे घबाड मिळून आले आहे. यात रोख रकमेसह दागिन्यांचा समावेश आहे. संशयित देशमुख याला बुधवारी दुपारी धुळे न्यायालयात उभे केल्यावर त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.
शिरपूर येथील नागरिकाला पशुपक्षी फार्मांचे दुकान सुरू करायचे होते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण केली होती. मात्र, स्थळ परीक्षण व इतर प्रक्रियेसाठी ८ हजारांच्या लाचेची मागणी झाली. ही लाच देशमुख याचा पंटर तुषार जैन याच्याकडे देण्याची सूचना होती. याबाबत संबंधित तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी तुषार जैन व नंतर देशमुख या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर जळगाव येथील मोरया हाइट्सजवळ असलेल्या द्रौपदी नगरातील घराची झडती घेतली. त्यासाठी जळगाव पथकाची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही घरझडती सुरू होती. बुधवारी दुपारी किशोर देशमुख व तुषार जैन यांना धुळे न्यायालयात उभे करण्यात आले. या दोघ आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घर झडतीत आढळली लाखोंची रोकड, दागिने
घरझडतीत ३१ लाख ३० हजार १०० रुपयांची रोकड मिळून आली. याशिवाय १७ लाख ४६ हजार १०० रुपये किमतीचे सोने व २२ लाख ७६० रुपये किमतीचे चांदीच दागिने देखील मिळून आले. एकूण ४९ लाख ७३ हजार ९५० रुपयांचे घबाड पथकाने जप्त केले आहे. शिवाय तसा अहवाल बनवून वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास व चौकशी धुळे एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी या करीत आहे.