चाळीसगाव व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची कार्यकारणी घोषित
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी आणि पत्रकारांच्या व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची बैठक चाळीसगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे ६ जानेवारी रोजी दुपारी १:३० वाजता घेण्यात आली. यामध्ये चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी संतोष भोई यांची तर शहराध्यक्षपदी गफ्फार शेख यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली.
ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश सरचिटणीस डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मिलींद टोके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीची सुरुवात संघटनेचे ध्येय व उद्दिष्टे, संघटनेच्या कार्याची संपूर्ण माहितीने करण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचवावी, याच अनुषंगाने चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी संतोष भोई, तालुका उपाध्यक्षपदी राकेश निकम, तालुका कार्याध्यक्षपदी अजगर मुल्ला, तालुका संघटकपदी कलीम सैय्यद, तालुका कार्यकारणी सदस्य प्रशांत जोशी, वाल्मीक गरुड यांची निवड करण्यात आली.
तसेच शहर कार्यकारणीमध्ये शहराध्यक्षपदी गफ्फार शेख, शहर उपाध्यक्षपदी रविंद्र कोष्टी, शहर सचिवपदी सुनील पाटील, शहर कार्याध्यक्षपदी महेंद्र महाले, शहर संपर्कप्रमुखपदी विजय गवळी, शहर संघटकपदी आनंद गांगुर्डे, शहर प्रसिद्धी प्रमुखपदी रणधीर जाधव, सदस्यपदी रोहित शिंदे, सोजिलाल हाडपे, जितेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित तालुका शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यानंतर मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकारदिन निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण चाळीसगाव तहसीलदार श्री.प्रशांत पाटील व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राहुलकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चाळीसगाव व्हॉईस ऑफ मीडिया चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.