रांजणगांव येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील रांजणगांव येथील रहिवाशी पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम करणाऱ्या काशिराम पावरा यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या चार वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. या घटनेनंतर रांजणगांव व परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती आणि भितीचे वातावरण देखील निर्माण झाले होते.या परिसरातील नागरीकांच्या बिबट्याला पकडण्याची मागणी लक्षात घेता वनविभागाने शितल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्कर चव्हाण यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी ६ पिंजरे आणि २८ ट्रॅप कॅमेरे लावले होते.
या लावलेल्या पिंजऱ्यात काल सायंकाळी एक नर व एक मादी अडकले. त्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतले. दोन बिबटे पकडले गेल्याने या भागातील बिबट्यांची दहशत कमी झाली आहे. असे असले तरी परिसरातील नागरीकांनी सावध राहण्याचे आवाहन यावेळी चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधकारी शितल नगराळे यांनी केले आहे. यावेळी वनविभागाचे सहकारी रांजणगावचे सरपंच प्रमोद चव्हाण व त्यांचे सहकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.