
(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगाव:- तालुक्यातील गणेशपुर शिवारात १४ वर्षाच्या बालकाचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्यासह आणखी एक अशा दोन बिबट्यांना पकडले होते. त्यातील एका बिबट्यावर उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यु झाला. वृद्धापकाळामुळे अशक्तपणा आल्याने या बिबट्याचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला आहे. मृत बिबट्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चाळीसगाव वनपरिक्षेत्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार गणेशपूर ता.चाळीसगाव येथे शनिवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी बिबट्याने अनिल नंदू मोरे या १४ वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्यास ठार केले होते. यानंतर या भागात मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार या भागात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी या ठिकाणी एक बिबटया जेरबंद करण्यात आला. त्यास नैसर्गिक अधिवासात हलविण्यात आले. या बिबट्याला पकडण्यात वन विभागला यश आले तरी याच भागात आणखी एक बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर रविवार २२ सप्टेंबर रोजी या बिबट्याला पकडण्यात आले.
या बिबट्याची वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव यांच्यामार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येत होती. २४ सप्टेंबर रोजीबिबट्याची प्रकृती ढासळल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे या बिबट्यावर उपचार करण्यात आले. मात्र काल दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास त्याच्या हालचालीकमी झाल्याचे लक्षात आल्यावर बिबट्याची तपासणी केली असता तो मृत आढळून आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत असल्याचे घोषीत केले. या मृत बिबट्याचे काल रोजी सहाय्यक वन संरक्षक जळगाव, पशुवैद्यकीय अधिकारी चाळीसगाव, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन चाळीसगाव, पशुधन विस्तार अधिकारी चाळीसगाव, पशुविकास अधिकारी गणेशपुर, वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव, मानद वन्यजीव रक्षक व वन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदन दरम्यान आढळलेल्या बिबट्याची निरीक्षणानुसार सदर बिबट्या हा अंदाजे १५ वर्षे वयाचा असून वयोवृद्ध आहे. वृद्धापकाळामुळे त्यास अशक्तपणा आल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुढील तपासाकामी मृत बिबट्याच्या अवयवाचे नमुने विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक येथे पाठवण्यात येणार असून मृत बिबट्यावर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या प्रचलित कायद्यानुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नुकतीच वन विभागाने दिली.