बहाळ येथील पांडुरंग महाराजांचा रथोत्सव जल्लोषात संपन्न.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगाव:- नुकताच चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे पांडुरंग महाराजांच्या जय घोषात रथो उत्सव साजरा करण्यात आला. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या येथील पाडुरंग महाराजांचा रथोत्सव एकादशी निमित्य साजरा करण्यात येतो. येथील रथोत्सवाला १८३३ पासून सुरुवात झाली असून अखंड सुरू आहे दसर्या नंतर येणार्या एकादशीला रथोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते .रथोत्सवात जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती. या रथोत्सवात श्रद्धेने भाविक सहभागी झाले होते. रथावर विठ्ठलाची मूर्ति विराजमान करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता विठ्ठल मंदिरापासून रथाची मिरवणूक मेनरोड ,सावता महाराज चौक ,जगनाडे महाराज चौक या मार्गाने काढण्यात आली. रथावर दोन्ही बाजूला भालदार, चोपदर, घोड्यांना हाकणारा सारथी असा देखावा सादर करण्यात आला होता. संपूर्ण रथाला फुलांनी व फळांनी, विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. त्यानंतर दोराच्या सहाय्याने भाविकांच्या उपस्थितीत ओढण्यात आला. सजविलेल्या रथाला सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वाणी मंगल कार्यालय जवळ पोहचविले.
रथाच्या पूजेचा मान पाडुरंग महाराजचे वंशज बाळकृष्ण ब्राह्मणकर व वासुदेव ब्राह्मणकर व सरपंच राजेंद्र मोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. रथाला थांबवण्यासाठी वडाच्या झाडाच्या मोगर्या सुतार समाजाकडे लावण्यात आल्या पुरातन काळातील संपूर्ण सागवाण लाकडापासून तयार करण्यात आलेल्या रथावर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहे. त्यावर दशावताराचे अप्रतिम कोरीव काम करण्यात आले आहे. रथाची ऊंची २५ फुट आहे रथावर दशावताराच्या मूूर्तीवर सुरेख कोरीव काम केलेले आहे. मोगर्या लावण्याचा मान सुतार समाजाकडे देण्यात आलेला होता. रथाच्या पुढे वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ टाळ मृदंगाने पांडुरंग महाराजांचे अभंगाणे परिसर दुमदुमला होता. तसेच ढोल ताशांच्या गजरावर लेझीम पावली नाचणारे भाविक मोठ्या प्रमाणात होते. या रथो उत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष भोई, उपाध्यक्ष बाप्पू कोठावदे, सचिव विसपुते, सदस्य सुनील करंकाळ, अनिल पाटील, रावसाहेब महाजन, एकनाथ कोळी, गोविंद परदेशी, वैभव पिंगळे यांच्यासह अनेक स्वयंसेवक व रथाचे मानकरी, भाविकांनी सहकार्य केले.