पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता गरजेची- ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे

पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता गरजेची- ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे
नाशिकनगरीत व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन संपन्न.
पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ.
उपसंपादक कल्पेश महाले
नाशिक – इलेक्ट्रिक बॉण्ड संदर्भात पत्रकारांनी आवाज उठवला नाही. म्हणून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथेच पत्रकारिता असफल ठरली. पत्रकारिता क्षेत्रातील वृत्तपत्र चालवणारे मालक विकले गेले तर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांनी काय करावे. पत्रकारितेच्या लिखाणातून लेख लिहून घेतल्यानंतर त्याचा फायदा राजकीय मंडळी घेतात. अनेक संमेलन व अधिवेशनाला गेलो, त्याठिकाणी राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. परंतु व्हाईस ऑफ मीडियाचे एकमेव अधिवेशन आहे की, त्याठिकाणी एकही राजकीय नेते उपस्थित नाही. पत्रकारांच्या कार्यक्रमात पत्रकारांना सन्मानाने व्यासपीठावर बसविल्यास तोच खरा पत्रकारितेचा सन्मान असतो. पत्रकारांच्या ३६० संघटना असल्या तरी त्या सद्याच्या स्थितीत दुकाने बनली आहेत. उठत सुटत कुणीही पत्रकार बनतं. मोबाईल हाती घेतला की पत्रकार होत नाही. पत्रकारिता करताना प्रामाणिकपणा असेल तर परमेश्वरही पूर्ण साथ देतो. पत्रकारिता हिम्मतीने केल्यास कोणाचीही तुम्हाला हात लावण्याची हिम्मत नसेल. पत्रकारिता करताना प्रामाणिकपणा असल्यास तरीही जीवन जगता येते. कोणाकडे पैसा मागण्यापेक्षा काम मागितल्यास आपली स्वतःची प्रतिष्ठा वाढते. पत्रकारितेत गुरूची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण पत्रकारितेतील संपादक हे आपल्यातील बातम्या लिहिण्याची क्षमता ओळखतात. म्हणून पत्रकारांनी आपली पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केले.
नाशिक येथील गोदावरी नदीच्या पावनभूमीत गरुड झेप अकॅडमीच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन २०२४ आयोजित करण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रजालनाने करण्यात आले. या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे होते.
कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, अजित कुंकलोळ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर,गुजरात प्रदेश अध्यक्ष जिग्नेश जोशी, उर्दु विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी, प्रदेश महिला संघटक यास्मिन शेख, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डिंगबर महाले, गजेंद्र मेंढी, गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्नेश जोशी, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, आदी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या सुरुवातीला डिंगबर महाले यांनी प्रास्ताविकातून व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे कार्य व महत्व पटवून दिले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडिया ही सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून असलेली संघटना एका गावापासून सुरू होऊन थेट ४१ देशात गेली आहे. संस्था म्हणजे माझे घर असे समजून प्रत्येक पत्रकार जुळत गेली आणि प्रत्येकाचे प्रामाणिकपणा व काम हेच संघटना महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. संघटनेचे देशभरात एक लाख ७६ हजार सदस्य झाले आहेत. पुढील पाच वर्षांत पत्रकारितेत बदल होईल. पत्रकारितेसाठी मिळणाऱ्या पदवींमध्ये बदल होणे आवश्यक आहे. पुढील दोन वर्षात १४८ देशात व्हॉईस ऑफ मीडियाचे संघटन करायचे आहे. उत्तर महाराष्ट्र अधिवेशनानिमित्त संवाद कौशल्य असलेली मंडळी एकत्र आले,याचा अभिमान आहे. संघटनेचे नाव कसे उज्वल होईल, यादृष्टीने प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. या संघटनेचे यशस्वी काम हे पुढील पिढीसाठी उपयोगात येईल, असेही संदीप काळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सांगितले की, पत्रकारांचे अनेक प्रश्न असून त्यावर मात करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने पंचसूत्री तयार करून काम करीत आहे. हे काम करताना अनेक अडचणी येतात. तरीही संदीप काळे हे व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत आहे. राज्यातील पत्रकारांच्या १४३ संघटनांमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया ही १४४ संघटना स्थापन होऊन संघटन मजबूत करण्यास व्हाईस ऑफ मीडियाला यश आले आहे. पत्रकारांचे घर व आरोग्य अशा अनेक विषयांवर व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना काम करीत आहे. पत्रकारांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास लोकशाही खऱ्या अर्थाने केली. पत्रकार हे आर्थिक दृष्ट्या सदृढ झाल्यास ते चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करू शकता व लढूही शकता. पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अशी वल्गना करण्यात येते, परंतु प्रत्यक्षात चौथास्तंभ हा अनेक अडचणींच्या सामना करतो, अनिल म्हस्के यांनी सांगितले.
या अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय संघटकपदी अशोक वानखेडे यांची नियुक्ती करून राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवनियुक्त राष्ट्रीय संघटक ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी अधिवेशनाला उपस्थित सर्व सदस्यांना संघटनेची शपथ देण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
व्हॉईस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा कार्यकारिणीने तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या अधिवेशनाला व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल भाडमुखे आणि अश्विनी पुरी यांनी केले. पहिल्या सत्राचे आभार दिलीप साळुंखे यांनी तर दुसऱ्या सत्राचे आभार मायकल खरात यांनी मानले,अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलग, कार्याध्यक्ष दिलीप साळूंके उपाध्यक्ष सुधीर उमराळकर, देविदास बैरागी, ब्रिज परिहार, सरचिटणीस देवानंद बैरागी,प्रवक्ता प्रमोद दंडगव्हाळ, विठ्ठल भाडमुखे,नरेंद्र पाटील,महानगर अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष मायकल खरात, सरचिटणीस संजय परदेशी, जितेंद्र येवले,महिला जिल्हा समन्वयक अश्विनी पुरी, कार्यवाह रश्मी मारवाडी, सुनीता पाटील, अश्विनी बोऱ्हाडे,करणसिंग बावरी,योगेश रोकडे,आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.