पक्ष्यांची शिकार करून ठार करणाऱ्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांची धडक कारवाई.

उपसंपादक कल्पेश महाले चाळीसगांव
भडगाव तालुक्यातील बांबरूड प्र.ब येथे दिनांक १४ मार्च २०२४ रोजी झाडावर जाळ्यामध्ये पक्षी अडकून शिकार केल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीचा अढवा घेत धुळे येथील वनसंरक्षक ऋषीकेश रंजन, जळगावचे उपवनसंरक्षक ए.प्रवीण, धुळे विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर, जळगाव सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी मिळालेल्या माहितीआधारे तपासाला सुरवात केली होती.
मिळालेल्या माहिती नुसार घटनास्थळी चौकशी केली असता, एका शेतकऱ्याने दोन मोटार सायकल ०४ व्यक्ती झाडावर जाळे टाकत असल्याचे फोटो काढले होते. त्या फोटो वरून मोटार सायकलचे क्रमांक तपासले असता ते करमाड ता.पारोळा येथील असल्याचे समजले. याचा माग घेवून नरेश धर्मा पाटील (२८) रा.करमाड ता.पारोळा, सचिन रोहिदास राठोड (२०) रा.करमाड, दादाभाऊ बापू सोनवणे (२५) रा.करमाड यांना ताब्यात घेतले त्यांच्या घराच्या झाडाझडतीत चिंकारा वन्यप्राण्याची शिंगे हस्तगत केली.
पकडलेल्या आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतले असता त्यात वटवाघूळ, इतर पक्षी, हरिणाची शिंगे, डुकराचे दात, मांडूळ सर्प, कासव, खवले मांजर, ससा यांच्या तस्करीचे तसेच काळ्या जादूसाठी वापरण्यात येत असलेले व्हिडीओ आढळले. याबाबत अधिक चौकशी केली असता पवन तुकाराम पवार (३५) रा.वरसाडे ता.पाचोरा यास ताब्यात घेतले असता, त्याने काळ्या जादूसाठी कासवाची तस्करी केल्याचे सांगितले. हे कासव गणेश शिवदास साबळे (३३) रा.जुनोने ता.जामनेर याचेकडून घेतल्याचे सांगितले. गणेश शिवदास साबळे ह्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
पवन तुकाराम पवार याची चौकशी केली असता संतोष नाना महाले याच्या घराची तपासणी केली असता १ कासव आढळून आले. पुढील चौकशी केली असता काही लोक काळ्या जादूसाठी मांडूळ सापाची तस्करी करत असल्याची बाब समोर आली.
याच तस्करीच्या शोधासाठी कोळगाव येथे सापळा रचला यात आकाश गोकुळ सौदागर, (१९) रा.पथराड ता.भडगाव, अक्षय गोकुळ सौदागर (२१) रा.पथराड, मुकुंदा पंढरीनाथ पाटील (३५) रा.वडजी, सुरेश रावण न्हावी, (४०) रा.वडजी यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून १ मांडूळ जातीचा साप हस्तगत केला.
वरील आरोपींच्या चौकशीतून साक्री तालुक्यातील जामदे येथूनही मांडूळ जातीचा साप हस्तगत केला. यात रवींद्र चिंतामण तायडे (३०) रा.करमाड ता.पारोळा व मच्छिंद्र मोरे (३२) रा.वडजी ता.भडगाव हे दोघे आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यानुसार वन्य प्राणी स्वतः जवळ बाळगणे, शिकार करणे, तस्करी करणे बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी एकूण ०४ मोटार सायकल, ०१ मारुती ओमनी गाडी, ०९ मोबाईल मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना दिनांक १४,२०,२२ रोजी मे. न्यायालय भडगाव येथे हजर केले असता त्यांना दिनांक २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
सदर कारवाई श्रीमती शितल नगराळे, वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव यांचेसह वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक जळगाव सचिन शंकर जाधव, वणपाल चंद्रशेखर पाटील, वनरक्षक राहुल पाटील, ललित पाटील, अजय महिरे, भागवत तेली, रवींद्र पवार, गुलाब पिंजारी, काळू पवार, मोनिका निकम, महेंद्र शिंदे, योगेश देशमुख, समाधान मराठे, बाळू शितोळे, भटू अहिरे यांच्या पथकाने केली.
वनविभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन
वनविभाग जळगाव यांच्यामार्फत सर्वांना सुचित करण्यात येत आहे की, कोणीही स्वतःजवळ कासव, पोपट, मांडूळ किंवा इतर वन्यजीव व वन्यजीवांचे अवयव बाळगू नये किंवा विक्री करू नये असं केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच असं कोणी करत असल्यास वनविभागाशी 1926 या नंबर वर त्वरित संपर्क साधून माहिती कळवावी असे आवाहन वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी केले आहे.