विधानसभा निवडणुकीच्या आज प्रचाराचा शेवटचा दिवस…
संपादक – राजेंद्र न्हावी
जळगाव – निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगबग सध्या उमेदवारांमध्ये आहे. आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर उमेदवारांना त्यांचा प्रचार करता येणार नाही. मागील काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंड होतील.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना चार नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. ऐन दिवाळीच्या दिवसात निवडणुका आल्याने सुरुवातीचे काही दिवस प्रचार फेऱ्या, सभा हे काहीस शांत वातावरण होतं. मात्र, पाच नोव्हेंबरनंतर राज्यात प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचे पाहायला मिळालं. सणासुदीच्या धावपळीतून निवांत झालेले नेते चौकसभा, घरोघरी जाऊन प्रचार करणे अशी सर्व काम करताना दिसले. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यासह सर्वच पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढताना दिसून आले. इतकच नाहीतर इतर राज्यातील नेतेमंडळी, मुख्यमंत्रीदेखील या विधानसभा निवडणुकीचे प्रचारात सामील झालेली पाहायला मिळाली. या सर्व प्रचार आणि रोडशोमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळालं.
संध्याकाळी सहानंतर प्रचार करण्याला बंदी
आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेपर्यंत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करता येणार नाही. टीव्ही, केबल, रेडिओ, सोशल मीडिया, प्रसिद्धीपत्रक अशा कोणत्याही माध्यमातून मतदारांवर प्रभाव पडेल अशा कोणत्याही बाबी उमेदवारांना प्रसिद्ध करता येणार नाहीत. सोबतच राजकीय जाहिराती, छोटेखानी कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका यामधूनदेखील प्रचार करण्यास बंदी असणार आहे. त्यामुळे आता उमेदवारांची मदार मागील काही दिवसात केलेल्या प्रचारावर अवलंबून असणार आहे.