
(उपसंपादक -:कल्पेश महाले)
चाळीसगांव:- तालुक्यातील खेडगाव, जामदा परिसरातील १७ शेतकऱ्यांना जवळपास ३५ लाखांत गंडविणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला पत्नी व मुलासह अटक करण्यात आली. तब्बल एक वर्षापासून हे तीनही जण पोलीसांना गुंगारा देत होते. कापूस व्यापारी पंडित दशरथ ब्राम्हणकर (वय- ५८), पत्नी छायाबाई ब्राम्हणकर ( वय – ५६), मुलगा चेतन व रूपेश ब्राम्हणकर (सर्व रा.खेडगाव ता.चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. पंडित ब्राम्हणकर याने मुलगा चेतन व रूपेश ब्राम्हणकर तसेच पत्नी छायाबाई यांच्या मदतीने जामदा, खेडगांव परिसरातील २५ ते ३० शेतकऱ्यांकडून तब्बल ४९० क्विंटल कापूस उधारीवर खरेदी केला होता. बराच कालावधी उलटूनही पैसे दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १७ शेतकऱ्यांनी मेहुणबारे पोलीसांत तक्रार अर्ज दिला. या प्रकरणी जितेंद्र सुपडू महाले (रा.जामदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार संशयितांविरुद्ध मेहुणबारे पोलीसांत ६ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे चारही जण फरार होते.
मेहुणबारे पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांना शेतकऱ्यांच्या तक्रारीची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच पोलीसांचे पथक संशयितांच्या शोधासाठी पाठवले. पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पो.कॉ.गोकुळ सोनवणे व निलेश लोहार यांच्या पथकाने पुण्यात जाऊन वरील संशयितांना अटक केली. सदरील प्रकरणातील संशयितांना दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी चाळीसगांव न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने जळगाव येथे न्यायालयीन कोठडी(MCR) सुनावण्यात आली आहे.
सदरील प्रकरणामधील फसवणूक करणारा कापूस व्यापारी सापडल्यामुळे आपल्या शेतमालाचे पैसे लवकरच मिळतील अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना लागली आहे.