
(उपसंपादक – कल्पेश महाले)
जळगाव : राज्य सरकारने गणपती व गौरींचे आगमन होण्यापूर्वी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा येणार अशी गोड घोषणा जाहीर केली होती. मात्र गौरी व गणपतीचे विसर्जन होऊन श्राद्ध कार्यक्रम देखील उरकण्यात आले. परंतु ना रवा मिळाला, ना साखर मिळाली, ना तेल मिळाले, ना काही वस्तू.. त्यामुळे तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये साखरे विना आनंदाचा शिध्याचा गोडवा अद्यापही मिळालेला नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून तीन नोटीस गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. शिधाचा गोडवा शासकीय गोदामामध्ये आलेला नसल्यामुळे ठेकेदाराने उर्वरित जिन्नसचा १०० टक्के पुरवठा अद्यापही केलेला नाही. सण उत्सवानिमित्ताने स्वस्त धान्य दुकानांवर आनंद शिधा देण्याची जाहीर करण्यात आले होते. मात्र ही गौरी, गणपती सण उत्सव साजरे झाल्यानंतरही शिधाची घोषणा हवेत विरली आहे. जाहीर झालेला आनंदाचा शिध्याचे उर्वरित जिन्नसाचा कोटा अजूनही पूर्ण न झाल्याने लाभार्थ्यांपर्यंत न पोहचता आनंदाचा शिधा गौरी गणपती सण उत्सव झाल्यानंतरही गोदामामध्ये राहिला आहे.
पारोळा, पाचोरा, चोपडा, बोदवड, धरणगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, कुऱ्हा, यावल, एरंडोल, भुसावळ, रावेर, सावदा असे एकूण जिल्ह्यात ५,९४,०५७ आनंदाचा शिधा मंजूर झालेला आहे. या आनंदाच्या शिध्यामध्ये रवा, साखर, चणाडाळ, खाद्यतेलाची पिशवी असे प्रकार आहेत यामधील साखर जळगाव जिल्ह्यातील भडगाव वगळल्यास अजून कोणत्याही तालुक्यात मिळालेली नाही. तर खाद्यतेल हे पारोळा, पाचोरा, चोपडा, बोदवड, धरणगाव, अमळनेर याठिकाणी मिळालेले नाही. चोपडा, धरणगाव, अमळनेर, भडगाव या ठिकाणी पिशव्या मिळालेल्या नाहीत. अजूनही रव्याचा पुरवठा २.५७ टक्के आहे. साखरेचा पुरवठा ९५.७९ टक्के , चनादळ १०.९५ टक्के, खाद्यतेल ६०.२९ टक्के, पिशव्या २४.०७ टक्के पुरवठा झालेला नाही. जिल्ह्यात पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने अजूनही १०० टक्के पुरवठा ३० दिवस होऊनही केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात गौरी गणपतीचा शिधा विसर्जन होऊनही वाटप झालेला नाही.
जळगाव जिल्हा आगामी गौरी गणपती-२०२४ सणानिमित्त आनंदाचा शिधा संच प्राप्त अहवाल जळगाव
याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून संबंधित ठेकेदाराला तीन नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठांना याबाबत माहितीही कळविण्यात आलेली आहे. मात्र तीस दिवस झाल्यावरही परिपूर्ण असा साखरेचा पुरवठा किंवा साखरेचा गोडवा अजूनही जळगाव जिल्ह्यात झालेला नाही. शिधा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही? शिधा मधील साखर अद्याप का पुरवली जात नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. शिधा मधील रवा, साखर, चणाडाळ, तेल व पिशव्या यांचा संपूर्ण साठा प्रशासनाला कधी मिळणार? कधी वाटला जाणार? असे प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारले जात आहेत.