
(उपसंपादक – कल्पेश महाले)
मुंबई:- महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध राजकीय पक्षांसह निवडणुकीशी संबंधित सर्वच भागिदारांशी झालेल्या चर्चेचा संक्षिप्त तपशील सांगितला. तसेच निवडणुकीची प्रक्रिया विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजे २६ नोव्हेंबरपूर्वी पार पाडण्याचे संकेतही दिले. त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी राज्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात या पथकाने शुक्रवारी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर काल विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तथा इतर भागिदारांशी चर्चा करून त्यांची निवडणुकीसंबंधीची मते जाणून घेतली. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्या दौऱ्याचा तपशील सादर केला.
सणवार लक्षात घेऊन मतदानाची तारीख ठरवणार
आम्ही दोन दिवस विविध राजकीय पक्षांसह सर्वच भागिदारांशी चर्चा केली. त्यात सर्वच पक्षांनी दीपावली, देव दिवाळी व छटपूजेसारखे सणवार लक्षात घेऊन निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती केली.
राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवण्याचीही सूचना केली. त्यांची ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, निवडणुकीची तारीख आठवड्याच्या शेवटी ठेवल्यामुळे शहरी भागातील मतदार सुट्ट्यांचा मेळ साधून शहराबाहेर जातात. त्याचा फटका निवडणुकीच्या टक्केवारीला बसतो. त्यामुळे मतदानाची तारीख आठवड्याच्या मध्यभागी ठेवली जावी अशी त्यांची विनंती होती, असे राजीव कुमार म्हणाले.
विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार
राजीव कुमार यांनी यावेळी महाराष्ट्रातील मतदारांची संख्या व इतर आकडेवारी सांगितली. ते म्हणाले, महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत. यापैकी २५ मतदारसंघ अनुसूचित जमाती (एसटी), तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्यापूर्वी पार पाडली जाईल.
रांगेत ताटकळत उभे राहण्यावर उपाय शोधणार
लोकसभा निवडणुकीत मुंबईसह अनेक शहरांतील मतदान केंद्रांवर मतदारांची तासंतास ताटकळत उभे राहण्यासारखी गैरसोय झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचनाही काही पक्षांनी केली. आयोग यासंबंधी खुर्च्या उपलब्ध करून देण्यावर विचार करेल. काही पक्षांनी निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या तटस्थपणे करण्यावर जोर दिला. काहींनी पैशांच्या गैरवापराकडेही लक्ष वेधले. विशेषतः काही पक्षांनी वृद्ध व दिव्यांग मतदारांना दूरच्या मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यात येणाऱ्या अडचणींवर योग्य ती उपाययोजना करण्याची विनंती केली.
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणारा पोलिंग एजंट त्याच बूथवरील असावा असा आग्रहीही काही पक्षांनी धरला. निवडणूक आयोग यावरही योग्य तो निर्णय घेईल. निवडणुकीच्या काळात फेक न्यूजची मोठी समस्या असते. त्यावरही काही पक्षांनी चिंता व्यक्त केली, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना करावी लागणार घोषणा
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना आपल्यावरील दाखल गुन्ह्यांची स्थानिक वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांत तीनदा जाहिरात द्यावी लागणार आहे. त्या जाहिरातीत त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत? ते सांगावे लागणार आहे. राजकीय पक्षांनाही हा नियम लागू असेल. त्यांनाही गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का दिली? हे नमूद करावे लागेल.
राज्यात १९.४८ लाख फर्स्ट टाईम मतदार
राज्यात एकूण ९.४९ कोटी मतदार आहेत. त्यात ४.५९ कोटी पुरुष, तर ४.६४ कोटी महिला मतदार आहेत. थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ असून दिव्यांग मतदारही ६.३२ लाख एवढे आहेत. महाराष्ट्रात थर्डजेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. हे सदृढ सामाज व कुटुंब व्यवस्थेचे लक्षण आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे १८ ते १९ वर्ष वयोगटातील संख्या १९.४८ लाख आहे. या निवडणुकीत आमचे या तरुण मतदारांवर खास लक्ष असेल. कारण हेच तरुण मतदार भविष्यात लोकशाहीला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
रश्मी शुक्लांविषयी तक्रार प्राप्त
राजीव कुमार यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत आयोगातर्फे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचीही माहिती दिली. ते म्हणाले, ३ वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असणाऱ्या विशेषतः स्वतःच्या जिल्ह्यात पोस्टिंग असणाऱ्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली केली जाईल. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविषयी तक्रार मिळाली आहे. त्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे. ट्रान्सफर व पोस्टिंगमध्ये पूर्ण पारदर्शकता राबवली जाईल. निवडणुकीची वेळ, टप्पे व तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
राज्यात १.८६ लाख मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ५२५८५केंद्र शहरी भागात, तर ५७,६०१ केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील. विशेषतः ३५० मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुणांकडे असेल, असे राजीव कुमार म्हणाले.
निवडणूक काळात एटीएम व्हॅनवर निर्बंध
निवडणूक काळात पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर रात्री ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पैशांची वाहतूक करता येणार नाही. या काळात रुग्णवाहिका, बँक व पतसंस्थांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.
गैरप्रकाराच्या तक्रारी ॲपवर करता येणार
निवडणुकीच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने सुविधा पोर्टल नामक एक ॲप तयार केले आहे. या ॲपवर मतदारांना आपल्या तक्रारी करता येईल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशिरापर्यंत मतदान सुरु असेल, तर केवळ फोटो काढून या ॲपवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथे पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.