तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात : पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
पुणे:- बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सतीश अरुण जाधव (वय ४२) असे लाच घेणाऱ्या पोलीसाचे नाव आहे. जाधव हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. ही कारवाई सोमवारी दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी कृपा बिअर शॉपीसमोर, मंत्रा सिटी रोड, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या दोन बिअर शॉपी आहेत. आरोपी पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर बिअर शॉपी व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी, कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी प्रत्येक बिअर शॉपीचे ६ हजार प्रमाणे दोन बिअर शॉपीचे एकुण १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक यांच्यासाठी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे दिली होती.
तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे कामासाठी तडजोडीअंती ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ५ हजार रुपयांची लाच स्विकारताना जाधव याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे यांच्या पथकाने केली आहे.