
(उपसंपादक – कल्पेश महाले)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या पथकाने ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केल्यानंतर शनिवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांनी दिवाळीनंतरच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.
त्यापुढे राजीवकुमार यांनी काहीही वक्तव्य केले नसले तरी दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आतिषबाजी होण्याची चिन्हे दिसत आहेत. विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यालाच निवडणुक होण्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका जाहीर सभेत पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली.
राजीव कुमार म्हणाले की, दिवाळीचा विचार करून निवडणुकीची तारीख ठरवावी. आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे शनिवार, रविवार सोडून मतदान घ्यावे, अशा सूचना सर्वच पक्षांनी केल्या. आता मतदान एका टप्प्यात होणार की दोन हे आम्ही लवकरच स्पष्ट करू. राज्यात २८८ पैकी २३४ खुले, २५ अनुसूचित जमाती (एसटी) तर २९ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया त्यापूर्वी होणार आहे. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत एटीएमसाठी पैसे नेणारी वाहने बंद असतील.
घड्याळ कोर्टात, त्यावर बोलू शकत नाही
अजित पवारांना मिळालेले घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे त्यावर बोलू शकत नाही, असे राजीवकुमार म्हणाले.
रश्मी शुक्लांविषयी आयोग योग्य तो निर्णय घेईल
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याविषयी राजीवकुमार म्हणाले की, आचारसंहिता लागू झाल्यावर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु आयोग एखाद्या पक्षाच्या वैयक्तिक तक्रारीवर काम करत नाही. लोकसभेला मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून पैसे वाटपाच्या तक्रारी होत्या, असे निदर्शनास आणून दिल्यावर सर्व घटकांची तपासणी होणारच आहे.
२२% महिला मतदार वाढले, एकूण महिला ४. ६४ कोटी
राज्यात एकूण ९ कोटी ५९ लाख मतदार पुरुष ४ कोटी ९५ लाख
महिला ४ कोटी ६४ लाख
२२ टक्के महिला मतदार वाढले
१९.४८ लाख पहिल्यांदाच मतदान करणार
६.३२ लाख दिव्यांग मतदार
८५ आणि त्याहून अधिक वय असलेले १२.४८ लाख मतदार
१०० किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे ४९०३४ मतदान १ लाख १८६ मतदान केंद्र, त्यात शहरात ४२ हजार ५८५, ग्रामीणमध्ये ५७ हजार ६०१.